माझा एकांत आणि मी…
आजकाल इथं आम्ही दोघंच असतो .. माझा एकांत आणि मी. आजकाल तसं दुस-या कुणाशी फारसं पटत नाही.. तासन तास दोघं बोलत बसतो, निश्चल अंधाराच्या काठाशी, कधी मनात जपलेल्या वाटांशी.. पहाटे.. किरकिरं घड्याळ तुझी स्वप्नं गढूळ करतं, माझ्यासारखाच तेव्हा तोही चिडतो. मग मी घड्याळाला गप्प करतो. ‘आता स्वप्नांतही भेटणं नाही’, असंच काहीसं बडबडतो.. खिडकीचा पदर बाजूला सारतो, तिच्या डोळ्यांतलं चांदणं हसतं… तेव्हा त्याला मी हळूच सांगतो की ‘तिच्या’ डोळ्यांतही असंच काहीतरी असतं. तुझ्या डोळ्यांत हरवलेल्या मला तो पुन्हा मागे खेचतो.. मी पापण्यांतले थेंब वेचतो..